
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरकारी रूग्णालय म्हणजेच जे जे रूग्णालयामध्ये काहीही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनानंतर नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक पद्धतीने राजीनामा दिल्याचे समोर आले होते.
त्यानंतर आता राज्य सरकारने जेजे रुग्णालयातील (JJ Hospital) प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांचा राजीनामा मंजूर केला आहे. जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभागप्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आरोपानंतर डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते. या डॉक्टरांमध्ये डॉ.शशी कपूर, डॉ.दीपक भट, डॉ.सायली लहाने, डॉ.रागिणी पारेख, डॉ.प्रीतम सामंत, डॉ.स्वरांजित सिंग भट्टी, डॉ.आश्विन बाफना आणि डॉ.हमालिनी मेहता यांचा समावेश होता. याप्रकरणावर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता सराकरने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे.
डॉ. लहाने यांच्या म्हणण्यानुसार, जे जे रुग्णालय प्रशासनाने आमची बाजू ऐकून घेतली असून निवासी डॉक्टरांना रुग्ण तपासणे आणि त्यांची हिस्ट्री लिहिणे हे कारकुनी काम असल्याचे वाटते. आमच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप झाल्याचे ऐकून मी निराश झालो, असे त्यांनी म्हटले.
तसेच जे जे रुग्णालय केवळ शिकवण्यासाठी नाही तर सेवेसाठी आहे, लांबून खेडेगावातून येणाऱ्या रुग्णाला सेवा देणे गरजेचे आहे. आमचे राजीनामा ३१ तारखेला व्यवस्थित फॉरमॅटमध्ये दिले आहे. आता राहिलेली प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करणार आहे. आरोपांमुळे आम्ही उद्विग्न झालो म्हणून राजीनामा दिल्याचे लहाने यांनी सांगितले.