मुंबई | Mumbai

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घोषणा केली. राज्यातील लाखो विद्यार्थी- पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याच्या निर्णयाची घोषणा वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. यावेळी त्या म्हणाल्या की, करोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा जवळपास बंदच आहेत. इयत्ता पहिला ते चौथीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. तर, 5 ते 8 वी पर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी हेही वर्ग सुरू भरलेच नाहीत. केवळ, ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगलच्या माध्यमातून आपण शिक्षण सुरू ठेवलं होतं, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीही आपण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, पहिली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक मुल्यमापन संदर्भात महत्वाचा निर्णय घेत असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत (RTE) या विद्यार्थ्यांचं वार्षिक मुल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा ते शक्य नाही. त्यामुळेच, पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. तसेच, इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठीचाही निर्णय लवकरच जाहीर करू, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. शहरी भागातील अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून, निकाल तयार केला आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपत असून, आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली होती.त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. या सर्व पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.