राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

२० सप्टेंबर पासून प्रक्रिया सुरू
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सोबी व महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूक) नियम २०१४ चे नियम ३ (पाच), नियम ६ व नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारानुसार प्राधिकरण निवडणूकीकरीता तयार करण्यात आलेल्या जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया (२५० व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून आणि निवडणूक प्रक्रिया सुरू असणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वगळून) सुधारीत कार्यक्रम सुरू करण्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी आदेश दि.१३ सप्टेंबर रोजी जारी केले आहेत.

आदेशात म्हंटले आहे की, जिल्हा निवडणूक आराखडयातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया दिनांक २० सप्टेंबर २०२१ पासून सुधारीत निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सुरू करावी. प्रथम टप्प्यातील संस्थांशिवाय इतर टप्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया परस्पर सुरू करू नये. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरु न करणेबाबत मा. न्यायालयाचे विशिष्ट संस्थेबाबत आदेश असल्यास अशा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येऊ नये.

जिल्हा निवडणूक आराखडयातील प्रथम टप्प्यातील ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूकीकरीता नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झालेली आहे अशा संस्था वगळून इतर सर्व सहकारी संस्थांच्या प्रारूप व अंतीम मतदार यादया दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ या अर्हता दिनांकावर पुन्हा नव्याने तयार कराव्यात. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र स्वीकरणे सुरू झालेले आहे. अशा 'अ' व 'ब' वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित टण्यापासून पुढे सुरू करणे बाबतचा सुधारीत निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव सादर करावा. तसेच 'क' वर्गातील सहकारी संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमास संबंधीत तालुका / प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांनी मान्यता रद्द करावी.

नियतकालीक बदली, सेवानिवृत्ती किंवा मृत्यू इ. कारणास्तव यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक घेणे शक्य नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्तो बदलाचा आदेश पारीत करण्याबाबतचा प्रस्ताव शिफारशीसह प्राधिकरणाकडे तातडीने सादर करावा.मतदार यादी व निवडणूक कार्यक्रमास जास्त खपाच्या एकाच स्थानिक वर्तमान पत्रात शासन मान्य दराने व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. कोव्हीड- १९ या जागतिक महामारीचा विचार करून निवडणूकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सैनीटायझेशन, थर्मल स्क्रीनीग इ. उपाययोजनांचा अवलंब करावा. तसेच कोव्होड २९ बाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

जिल्हा निवडणूक आराखडयातील दोन ते सहा टप्यातील निवडणूकीस पात्र सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार यादया तयार करण्यासाठी प्राधिकरणाकडूनच टप्याटप्प्याने अर्हता दिनांक स्वतंत्र आदेशाने घोषित करण्यात येईल.

निवडणूकीस पात्र असणा-या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरीता आवश्यकता असल्यास शासनाच्या इतर विभागातील समकक्ष अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करावी. प्राधिकरणाकडून जिल्हानिहाय निवडणूक प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले असून त्यांचेमार्फत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे नियंत्रणाखाली निवडणूक प्रयोजनार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण दयावे. १०. निवडणूक प्राधान्य मनुष्यबळ व साधनसामुग्री विचारात घेऊन दिनांक ०१ जानेवारी २०२१ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवणुकीकरीता प्राधिकरणाकडून स्वतंत्र आदेश पारीत करण्यात येतील.

नगर जिल्ह्यात अनेक दिग्गजांच्या संस्थांच्या निवडणुका

सहकार क्षेत्रावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आजही कायम आहे. येत्या काळात सहकारात पुन्हा निवडणुका होणार आहेत. त्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या कार्यक्षेत्रातील संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे या नेत्यांची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. या सहकारी संस्था ताब्यात ठेवून सहकारातील राजकारण आपल्या हातात ठेवण्यासाठी प्रमुख नेत्यांमध्ये ‘घमासान’ होणार आहे. श्रीरामपुरात अशोक सहकारी साखर कारखाना, बाजार समिती, मुळा प्रवरा वीज संस्था, राहुरीतील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना, बाजार समिती, संगमनेर शेतकी संघ, बाजार समिती, कोपरगाव, नेवासा, राहाता, अकोले तसेच अन्य बाजार समित्या, अगस्ति साखर कारखाना तसेच सहकारी बँका, पतसंस्था, दूध संघ, हाउसिंग आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यात होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com