चहूबाजूच्या टीकेनंतर अजित पवारांनी रद्द केला 'तो' निर्णय

चहूबाजूच्या टीकेनंतर अजित पवारांनी रद्द केला 'तो' निर्णय

मुंबई | Mumbai

करोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाटच आहे. विकासकामांवरील निधीला कात्री लावली जात आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी तब्बल सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र करोनाच्या संकटकाळात पैशांची अशी उधळपट्टी होत असल्याने राज्यभरातून या निर्णयावर टीका करण्यात आली. त्यानंतर आता अखेर हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

'उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा,' असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच 'उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही, सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल,' असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

अजित पवारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्याची जबाबदारी बाहेरील एजन्सीवर सोपवण्यात येणार होती. यासाठी ठाकरे सरकार जवळपास सहा कोटी रुपये खर्च करणार होतं. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंबंधीचा आदेश जारी केला होता. अजित पवार यांनी घेतलेले निर्णय सामान्यांपर्यंत पोहोचावेत याची जबाबदारीही या एजन्सीवर देण्यात येणार होती. अजित पवारांचं ट्विटर हॅण्डल, फेसबुक, ब्लॉगर, युट्यूब, इन्स्टाग्राम अकाऊंट्स हाताळण्याची तसंच साऊंड क्लाऊड, व्हॉट्सअॅप बुलेटिन, टेलिग्राम चॅनेल आणि एसएमएस या जबाबदाऱ्याही त्यांच्याकडे देण्यात येणार होत्या.

भाजपकडून टीका

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरला व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एनज्सी तात्काळ रद्द करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. “लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? करोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल,” अशी टीका त्यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com