मुंबई l Mumbai

संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

वाँगचूक यांच्या प्रयोगाचे ,’ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम. तुमच्या जिद्द आणि समर्पणाला सोनम जी सलाम!’ अशा शब्दांत कौतुकदेखील केले आहे.

मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हंटले आहे की, “देशाच्या रक्षणासाठी अविचल, निष्ठेने सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयोग व्हावा यासाठी धडपडणे यालाच देशभक्ती, देशप्रेम म्हणतात. बर्फाच्छादित प्रदेश, कडाक्याची थंडी या निसर्गाच्या प्रकोपाला तोंड देतानाच, देशाच्या सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या शत्रूलाही जरब बसवण्यासाठी आपले जिगरबाज जवान डोळ्यात तेल घालून सतर्क असतात. या जवानांचा आणि पर्यावरणीय समतोल यांचा विचार करून तुम्ही संशोधित केलेल्या सुविधा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील. देशाप्रती तुमची ही बांधिलकी तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि देशाभिमान जागृत करणारी ठरेल असा विश्वास आहे. तुमच्या अशा सर्व प्रयत्न, प्रकल्पांना जरूर पाठबळ देऊ. या शब्दांसह, सोनम जी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…जय हिंद!!”

काय आहे नेमका शोध ?

लडाखच्या भूमीवर जवळपास १२ हजार फुटाच्या उंचीवर आपले जवान रात्रंदिन देशाची सेवा करत असतात, पहारा देत असतात. या ठिकाणी रक्त गोठणारी थंडी असते. अशाही स्थितीत भारतीय जवानांना शत्रुवर नजर ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागतं रहावं लागतं. आता यावर सोनम वांगचुक यांनी एक अनोखा उपाय शोधलाय. त्यांनी अशा तंबूचा शोध लावलाय की त्यात उणे १४ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षाही कमी तापमानाला देखील जवानांना काहीच थंडी वाजणार नाही. सोनम वांगचुक यांनी जवानांसाठी सोलर हिटेड मिलेटरी टेन्ट तयार केला आहे. या टेन्टमध्ये उणे तापमानातही निवांत राहू शकता येते. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन सांगितलंय की उणे १४ डिग्री सेल्सियमध्येही या टेन्टमध्ये आरामात राहता येतं. तसेच भारतीय जवानांसाठी या टेन्टचा वापर केला तर उर्जेसाठी करण्यात येणाऱ्या केरोसीनचा वापर करता येतो आणि त्यामुळे प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित येईल. तसेच या टेन्टचे वहन करायचे असेल तरीही सोपं आहे. या सर्व साहित्याचे एकूण वजन ३० किलोपेक्षा कमी आहे. या एका टेन्टमध्ये किमान दहा जवान राहू शकतात. हे टेन्ट कोणत्याही कार्बनचे उत्सर्जन करणार नसल्याची माहिती सोनम वांगचुक यांनी दिली आहे.

स्टूडंट्स एज्युकेशनल अॅन्ड कल्चरल मू्व्हमेंट्स ऑफ लद्दाख (SECMOL) या संस्थेच्या माध्यमातून सोनम वांगचुक शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनम वांगचुक यांनी लडाखमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून आईस स्तूपचा शोध लावला. त्यांच्या या शोधाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.