मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र

आता ‘जानेवारी ते डिसेंबर’ शैक्षणिक वर्ष?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

दरवर्षी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का? त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. CM Uddhav Thackeray

तसेच, केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून, या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जाणून घेतले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा बैठकीत सहभाग होता.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील. काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावेच लागतील. तर जे स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्यात काही अडचणी आहेत, तर त्याबाबतही विचार करावा लागेल. यादृष्टीने या धोरणाची सध्या केवळ घोषणा करण्यात आली आहे. आपण राज्यभरातील सर्व विभागांचे प्रतिनिधित्व असलेला तज्ज्ञ व संशोधक, अभ्यासक यांचा गट स्थापन करून या धोरणाच्या संदर्भात विचार करणे योग्य ठरेल. यामध्ये तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण तसेच मातृभाषेतून शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल, तसेच ते जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतील असा प्रस्तावित शैक्षणिक ढाचा यावर सखोल चर्चा करता येईल. यामुळे राज्यातील विद्यार्थ्याना खर्‍या अर्थाने लाभ आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडू शकतील का? ते पाहण्याची गरज आहे.

करोना परिस्थितीमुळे सध्या सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राज्यात काहीही झाले तरी 100 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन व जसे शक्य होईल, तसे शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षण विभागाने यातील सर्व उणीवा, अडथळे दूर करावे. शिक्षकांची उपस्थिती कशी आहे ते तपासावे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत, त्या तत्काळ पहाव्यात. तसेच, नेहमी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का? त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील यावर बोलले.

मागील तीन महिन्यांपासून राज्यात शिक्षणाला सुरुवात झाली आहे. याबाबत शिक्षण विभाग ऑक्टोबरपर्यंत एकूणच बदललेल्या स्थितीत विद्यार्थी, शिक्षक यांना दिल्या जाणार्‍या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाच्या फलश्रुतींचा आढावा घेणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरु करता येतील का? यावरही बैठकीत चर्चा झाली.

मंत्री वर्षा गायकवाड यांनी 11 वी प्रवेशाचे काम व्यवस्थित सुरु असल्याचेही यावेळी सांगितले. पहिली ते बारावीपर्यंत 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे, असेही त्या म्हणाल्या. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी प्रारंभी ऑनलाईन शिक्षण हळूहळू अंगवळणी पडते आहे, असे सांगून पाठ्यपुस्तकेही सर्वांपर्यंत वितरीत झाल्याचे सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com