मुंबई -

करोना संकटामुळे महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी चैत्यभूमी येथे येऊ नये, ऑनलाईन व थेट प्रक्षेपणातून अभिवादन करावे, असे आवाहन महापालिकेकडून

करण्यात आले होते. त्यास अनुयायांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन अभिवादन केले.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन रविवारी सकाळी 7.45 ते सकाळी 9 या वेळेत शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर दर तासाला 10 मिनिटांसाठी याप्रमाणे दुपारी 1 वाजेपर्यंत सह्याद्री वाहिनीवर प्रसारण करण्यात आले. दूरदर्शन नॅशनल या सुमारे 33 लाख सबस्क्रायबर असलेल्या यूट्यूब चॅनलवरुनही दूरदर्शनने सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत थेट प्रसारण केले. या प्रक्षेपणासाठी हाय डेफिनेशन ब्रॉडकॉस्टींगची सुविधा असलेली ओबी व्हॅन आणि एकूण 46 जणांचे पथक चैत्यभूमीवर तैनात केले होते.

शंभर टक्के प्रतिसाद

करोना संसर्ग पसरु नये. यासाठी खबरदारी म्हणून अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर न येता ऑनलाईन प्रक्षेपणातून अभिवादन करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. अनुयायांनी त्यास शंभर टक्के प्रतिसाद दिला.

यंदा गर्दी नाही

चैत्यभूमीसह लगतच्या परिसरात अनुयायांची दरवर्षी दिसणारी प्रचंड गर्दी यंदा झाली नाही. सरकारने तसेच महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला संपूर्ण प्रतिसाद देऊन अनुयायांनी सर्वांसमोर अनोखे उदाहरण ठेवले आहे.

- सह्याद्री वाहिनीवरुन चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

- दूरदर्शनचे यूट्यूब चॅनल, महापालिकेचे यूट्यूब, फेसबूक, ट्विटरवरुनही चैत्यभूमीसह राजगृह येथील अभिवादनाची थेट प्रक्षेपण व्यवस्था करण्यात आली.

- अनुयायांना आपापल्या घरी राहून चैत्यभूमीचे दर्शन घेणे व अभिवादन करणे शक्य झाले.

- चैत्यभूमी येथे मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

- शासनाच्या वतीने शासकीय मानवंदना प्रदान करण्यात आली.

- हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

- महापालिकेच्या माहिती पुस्तिकेचे, शासनाचे मुखपत्र लोकराज्य या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.