राज्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे वितरण
राज्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्राच्या ( Maharashtra ) कानाकोपऱ्यात पाणी (water ) पोहोचवून जलक्रांती घडवू, पाण्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ठरणारे, वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. ते वळवावे लागेल. त्यातून जलक्रांती होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी मंगळवारी येथे केले.

माजी मुख्यमंत्री कै.डॉ. शंकरराव चव्हाण ( Former Chief Minister Late Dr. Shankarrao Chavan )यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण आणि पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे ( Dr. Shankarrao Chavan Jalbhushan Award) वितरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पाण्याच्या नियोजनाचे महत्व विशद केले.

किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्यातून गोडे पाणी उपलब्ध करणे, तसेच मराठवाडा आणि विदर्भातील परिसरासाठी पाणी वळवण्याचा पर्याय उपयोगात आणावा लागेल. भावी पिढ्यांसाठी आपल्याला पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. राज्यातील वाया जाणारे पाणी, समुद्राच्या पाण्याचा उपयोग अशा अनेक गोष्टींवर विचार करावा लागेल. इस्त्रायलसारख्या देशात खारे पाणी गोडे करून वापरण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. आपल्याकडेही हे तंत्रज्ञान विकसित करत आहोत. नवीन धरणापेक्षा आहे त्या संसाधनाचे बळकटीकरण करावे लागेल. त्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे ठाकरे यांनी सांगितले.

उत्कृष्ट नियोजनाची दूरदृष्टी असलेले दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण हे आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आपण जलसंपदा विभागामार्फत हे पुरस्कार देत आहोत. जलसाक्षरता आणि पाण्याचे नियोजन यासाठी जलभूषण पुरस्कार विजेत्यांनी केलेले काम पुढे अनेकांपर्यंत पोहोचावे, त्यातून जलसाक्षरता निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com