आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
महाराष्ट्र

आषाढी वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा

यंदा घरोघरी आषाढ वारी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : भीमा नदीच्या किनाऱ्यावरील पंढरपूर हे श्री विठ्ठल व रुक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. येथील आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्र हे चार महत्वाचे वारी उत्सव आहेत. वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. यापैकी आषाढी व कार्तिकीला जवळपास ८ ते १० लाख वारकरी भक्त समुदाय पंढरपूरात दर्शनासाठी असतो. जून महिना आला की सर्व भाविकांना वेध लागतात ते आषाढी वारीचे. महाराष्ट्रातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या मोठ्या १००-१५० पालख्या आणि १५-२० लाख वारकरी हे प्रत्येक वर्षी आषाढी वारीला जात असतात.

महाराष्ट्रामधील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात व पायी प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूरात पोचतात. त्यात इतर राज्यातूनही वारकरी वारीमध्ये सामील होतात. वारकऱ्यांना सामूहिक भोजन, न्याहारी, फलाहार यासोबतच पुढील प्रवासात उपयोगी पडेल असा कोरडा खाऊ दिला जातो. पालखी सोहळ्यासोबत माऊलींचे मानाचे अश्व असतात. त्यांची देखभाल करण्यासाठी चारा, खुराक यांची सोयही केली जाते. आषाढी वारीकरता आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठण येथून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीरांची, मुक्ताबाईची मुक्ताईनगर, जळगांव येथून आणि सोपानकाका यांची सासवडहून, हे सात प्रमुख मानाचे पालखी सोहळे येत असतात.

पंढरपूरच्या वारीला जसे ऐतिहासिक महत्व आहे तसेच जागतिक पातळीवर सुद्धा महत्व प्राप्त झाले आहे. वारीचे उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन, वारकऱ्यांचे संयम, शिस्त, नामस्मरण गुण हे शिकण्यासारखे आहे. वारकरी टाळ, मृदूंग, चिपळ्याच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत प्रवास करत असतात. त्यामुळे दिंडीत उत्साहाचे, आनंदाचे वातावरण तयार झालेले असते.

आषाढी वारी म्हणजे काय ?

आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पायी यात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीसाठी जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय होय. या वारीत अनेक जाती धर्माचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो. महाराष्ट्रातील अनेक गावांपासून वारी सुरु होऊन पंढरपूर येथे पूर्ण होते.

माळकरी/ वारकरी :

वारी करणाऱ्या व्यक्तीला वारकरी असे म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार मानल्या जाणाऱ्या विठ्ठलाचे ते भक्त असतात. त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात. स्नान करून भाळी गोपी चंदनाचा टिळा लावतात. नियमित हरिपाठ म्हणतात. संतांच्या ग्रंथांचे वाचन करतात. देवांच्या मूर्तीचे दर्शन करतात आणि भजन कीर्तनात आपला सहभाग नोंदवतात. वारी करून तसेच एकादशीचे व्रत करतात.

वारीचा इतिहास :

पायी केल्या जाणाऱ्या वारीची परंपरा फार जुनी आहे. तेराव्या शतकापासून ही परंपरा सुरु असल्याचा उल्लेख सापडतो. ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारी करत असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातींना सोहळ्यामध्ये सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज या संतांनी वारीची परंपरा पुढे चालवली. संत तुकाराम महाराजांच्या कुटुंबात वारीची परंपरा होती. पंढरपूर म्हणजे सर्व संतांचे माहेर होय. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होत.

यावर्षी करोना विषाणूचे संकट असल्यामुळे वारीचे स्वरूप आणि नियम बदलले जाण्याची शक्यता आहे. वारीवर असणाऱ्या कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे वारकऱ्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला घरूनच नमस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु संतांच्या पादुका विठुरायाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत. त्यासाठी कोरोना विषाणूची सध्याची परिस्थिती लक्षात ठेऊन बस, विमान, हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार असण्याची शक्यता आहे. आषाढी वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा असतो. पण वारीची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी परवानगी असलेल्या ठराविक संस्थानांच्या पादुका आषाढी एकादशीच्या आधी दशमीला पंढरपूरला पोहोचवण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून करण्यात आला. अगदी मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत करोना विषाणूची नियमावली पाळत संत तुकाराम यांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून, संत निवृत्तीनाथ त्रंबकेश्वर येथून, संत एकनाथांचे पैठण येथून आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान आळंदी येथून झाले आहे. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com