
मुंबई | Mumbai
राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे (Drugs Mafia Lalit Patil) गदारोळ माजला आहे. या ड्रग्ज प्रकरणात सत्तेत असलेले आमदार आणि मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या प्रकरणी काल (गुरुवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील चर्चा झाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ललित पाटीलबाबत काही सूचक विधाने करून या प्रकरणात ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंची (Thackeray Group) कोंडी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ललीत पाटील याला १० डिसेंबर २०२० या तारखेला अटक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना नाशिकचे शिवसेनेचे प्रमुख केले होते. अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला आणि १४ दिवसांचा पीसीआर मिळाला. त्यावेळी गुन्हा गंभीर असल्यामुळे १४ दिवसांचा पीसीआर मिळाला.
मात्र कोर्टाने पोलीस कोठडी सुनावताच ललित पाटील हा ससूनला अॅडमिट झाला. पूर्ण १४ दिवस ते ससूनमध्ये अॅडमिट होता. मात्र सरकारी पक्षाकडून ललित पाटलीची चौकशी केली गेली नसल्याबाबत कोर्टाला अर्जही करण्यात आला नाही. शेवटी १४ दिवसांनी त्याचा एनसीआर करून टाकला. आता गुन्ह्यात केस उभी करायची तर काय उभी राहणार? गुन्हेगाराची चौकशीच झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
१४ व्या दिवशी त्यांचा एनसीआर काढला. ज्यावेळी गुन्हेगार आतमध्ये जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांची चौकशी देखील केली नाही. माझा प्रश्न आहे की ललित पाटील यांची चौकशी का करण्यात आली नाही. तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते? अजून खूप गोष्टी आहेत सध्या मी बोलणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
ललित पाटील हा शिवसेनेचा नाशिकमधला शहरप्रमुख होता म्हणून त्याला ही सवलत मिळाली का, कुणाच्या फोनमुळे मिळाली, मुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या की आणखी कुणाच्या, या प्रकरणात आणखी अनेक गोष्टी समोर येणार आहेत, असे सूचक संकेतही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.