गाववाल्यानू गावाक जाताय? आधी ट्रेनचे वेळापत्रक बघा; कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

गाववाल्यानू गावाक जाताय? आधी ट्रेनचे वेळापत्रक बघा; कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई | Mumbai

गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हणजे कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे काही महिन्यांपूर्वीपासूनच कोकणवासीय रेल्वेचे तिकीट आरक्षित करत असतात. मात्र रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोकणवासीयांना (Konkan Trains Delayed) रेल्वेस्थानकांवर ५ ते ६ तास ताटकळत थांबावे लागत आहे. दिवा स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावाला जाण्यासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली असून या ट्रेनचे वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या उशिराने धावत आहेत.

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या ६ तास उशिराने धावत असल्यामुळे कोकणवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. १२ तासांच्या प्रवासासाठी कोकणाची वाट धरलेल्या चाकरमान्यांना तब्बल १८ तास लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एसटी आणि खासगी बसेसनाही प्रचंड गर्दी झाल्याने चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. कुटुंबकबिल्यासह गावाकडे जायला निघालेल्या चाकरमान्यांची ऐनवेळी चांगलीच तारांबळ उडाली आहे.

कोकणकन्या, तुतारी, मेंगलोर एक्सप्रेस, कुडाळ गणपती स्पेशल, दिवा – रत्नागिरी या गाड्या विलंबाने धावत आहेत. मुंबईकडून तळकोकणात येणाऱ्या मार्गावर अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. वीरपासून तळकोकणापर्यंत कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक आहे. मुंबईहून तळ कोकणात जाण्यासाठी रेल्वेने १२ तास लागत आहे. चार तास गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच चार तास खोळंबून राहावे लागत आहे.

आज सकाळी सीएसएमटीहुन मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस सुटलीच नाही. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांच्या नशिबी प्लॅटफॉर्मवर तिष्ठत राहण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

गाववाल्यानू गावाक जाताय? आधी ट्रेनचे वेळापत्रक बघा; कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
New Parliament : नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण

वसई विरार स्थानकातून बसेस

वसई, विरार, नालासोपाऱ्यातून जवळपास ३५० च्यावर एसटी महामंडळाच्या बस काल रात्री कोकणात रवाना झाल्या असून या रवाना झालेल्या बसमधून कोकणवासीयांचे स्वागत करण्यासाठी आणि या जाणाऱ्या बसची आम्हीच सुविधा केली आहे. तसेच, विरार पूर्व मनवेलपाडा तलाव परिसरात आज सकाळ पासूनच कोकणात जाण्यासाठी जळगाव, औरंगाबाद, अर्नाळा, वसई, विरार, नालासोपारा बस आगारातील अडीचशेच्या वर बस दाखल झाल्या होत्या.

ठाण्यात प्रवाशांची झुंबड

सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असल्यामुळे प्रत्येकामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने कोकणवासी आपल्या गावी जात असतात. तसेच गावी जाण्यासाठी फलाटावर मोठी गर्दीही होत असल्याचं पाहायला मिळाले. रेल्वेनं गावी जाण्यासाठी मुंबई, ठाण्यातील चाकरमानी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्रं पहायला मिळाले. या गर्दीमुळे काही प्रवाशांची ट्रेनही मिस झाली. त्यामुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली होती. यंदा कोकणात २०० हून अधिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईतून मोठ्या प्रमाणावर भाविक गणेशोत्सवासाठी कोकणात निघाले आहेत. मात्र, मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली झाल्यामुळे १२ तास उलटूनही त्यांना अजून घर गाठता आलेले नाही. नागोठणे नजिक वाकण फाटा येथे वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे गाड्या मंद गतीने चालत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. पण यासाठी आणखी मोठा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. शनिवारचा वर्किंग डे उरकून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकण मार्गे निघाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com