
कोल्हापूर | Kolhapur
शिवराज्याभिषेक दिनी काही तरुणांनी मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. त्यावरुन कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण झाला. त्यातच काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. 7 जून रोजी कोल्हापूरातील शिवाजी चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. त्यातून या जमावाने पोलिसांसोबत हुज्जत घातली. आक्रमक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर या जमावाने कोल्हापूरमध्ये तोडफोड केली...
याप्रकरणी आतापर्यंत ३६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तिघांना बाल न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जाईल. या गुन्ह्यात सुमारे 300 ते 400 संशयित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.
तरुणांनी मोबाईल स्टेटस ठेवल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांनी मोबाईल स्टेटस कॉपी करुन आपल्या मोबाईलवर ठेवल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र, त्यांनी ज्या मोबाईल अॅपवर हे स्टेटस ठेवले ते अॅपच तरुणांनी मोबाईलमधून काढून टाकले आहे. त्यामुळे त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सध्या सुरु असल्याचेही ते म्हणाले.
आज पुन्हा एकदा नव्याने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. त्या आधारे काही नवीन संशयित समोर येतील. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. आज रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद राहील. तोपर्यंत तणाव पूर्णपणे निवळलेला असेल. आताच अनेक भागांतील दुकाने सुरू झाली आहेत, अशी माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली.