
पुणे | Pune
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चक्कर आल्यामुळे बंडातात्यांची तब्येत खालावली. त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बंडातात्या कराडकर हे पुण्याहून कीर्तन करुन फलटण तालुक्यात आले होते. बंडातात्या यांना काल (12 जानेवारी) सकाळी त्रास जाणवू लागल्यावर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या साधकांनी दाखल केले होते. यावेळी तात्यांचा रक्तदाब आणि शुगर खूपच वाढल्याने त्यांचा त्रास वाढला होता. यामुळे त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले. कालच्या उपचारानंतर तात्यांची प्रकृती स्थिर झाली.
हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
काही दिवसांपूर्वीच बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींच्या अंहिसावादी विचारांनी लक्ष केलं होतं. महात्मा गांधीजीचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी हुतात्मा राजगुरुंच्या स्मुर्तीस्थळावर केलं गोतं. तसंच, महात्मा गांधींचा म्हाताऱ्या म्हणून उल्लेखही त्यांनी केला होता. महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन काळात मंदिरे खुली न केल्यामुळे बंडातात्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक पत्रं लिहून सरकारचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करू नका, असं आवाहनही केलं होतं.
एवढंच नाहीतर 'राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतही बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे या प्रकरणी बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काही वर्षांपूर्वी डाऊ केमिकल यां कंपनीच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळंही बंडातात्या कराडकर हे चर्चेत आले होते. २००८ मध्ये बंडातात्या कराडकर यांनी हे आंदोलन केलं होतं. त्यावेळी सरकारनं त्यावेळी डाऊ केमिकल या परदेशी कंपनीला महाराष्ट्रात त्यांचा कारखाना उभारण्याची परवानगी दिली होती. पण या कंपनीमुळं इंद्रायणी नदीसह आसपासच्या परिसरात प्रदूषण होईल यामुळं त्याला स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला होता. या आंदोलनामध्ये बंडातात्या कराडकर यांनी त्यावेळी उडी घेतली होती. त्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं करण्यात आली होती. अखेर या विरोधामुळे या कंपनीला काढता पाय घ्यावा लागला होता.