मोटारसायकल अपघातात दोघंभाऊ ठार

मोटारसायकल अपघातात दोघंभाऊ ठार

लग्नानिमित्तच्या धान्य खरेदीसाठीे जळगावात आलेला तरुण व त्याच्या सोबतचा चुलत भाऊ मोटारसायकल अपघातात ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी किनोद-फुपणी गावादरम्यानच्या घडली. या अपघातामधील एका मृत तरुणाचा मागील महिन्यातच साखरपुडा झाला होता. तर त्याचे लग्न 2 मार्च रोजी  होणार होते.

भूषण विठ्ठल सोनवणे (वय 23) आणि रवींद्र भगवान सोनवणे (वय 27, दोन्ही रा. देवगाव, ता. जळगाव) हे दोघं जण जळगावात लग्न समारंभासाठी लागणार्‍या धान्याच्या खरेदीसाठी जळगावात आले होते.

जळगावातील काम संपल्यानंतर दोघं जण आपली दुचाकी (क्र. एम एच 19, 0657) घरी जात होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास किनोद-फुपनी गावादरम्यान समोरुन येणार्‍या अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात भूषण सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र सोनवणे गंभीररित्या जखमी झाला.

या घटनेबाबत कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून भूषणचा मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणला. तर जखमी रवींद्र सोनवणे यास खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना रवींद्र सोनवणे याचाही मृत्यू रात्री 8 वाजेच्या सुमारास झाला.

त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान, समोरील अज्ञात मोटारसायकलवरील दोन जण सुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावरही खासगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.

2 मार्चला होते लग्न

मृत भूषण सोनवणे याचा साखरपुडा मागील महिन्यात   झाला. तर त्याचे लग्न 2 मार्च रोजी  होणार होते. त्यानिमित्ताने रेशन धान्याच्या कामासाठी भूषण जळगावला आला होता.

भूषणचा मृतदेह बघताच नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई कलाबाई सोनवणे, शरद आणि योगेश हे दोन भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com