बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय ठेवा

- कृषीमंत्री दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय ठेवा

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाणांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत समन्वयाचे काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी येथे दिले.

गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हे लक्षात घेता यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीसाठी विशेष मोहिम घेण्याचे निर्देशही भुसे यांनी यावेळी दिले.

आज मंत्रालयात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन, कापूस आणि मका पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषि सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, संचालक दिलीप झेंडे तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी भुसे म्हणाले, जिल्हानिहाय पीक पध्दती लक्षात घेवून मागणी प्रमाणे त्या त्या पिकांचे बियाणे पुरवठा करण्यावर कंपन्यांनी भर द्यावा. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने समन्वयाचे काम करावे. त्यासाठी कृषि आयुक्तालय पातळीवर नव्याने स्थापित करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष उपयोगी ठरेल.

गेल्या वर्षी मोठया प्रमाणात सोयाबीन बियाणे तक्रारी कृषि विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. हे लक्षात घेऊन पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके जास्तीत जास्त प्रमाणावर आयोजित करावीत. अशा प्रात्यक्षिकांच्या दरम्यान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषि सेवा केंद्राचे प्रतिनिधी शेतकरी वर्गात जाणीव जागृती निर्माण करण्यास उपलब्ध झाल्यास मोठा सकारात्मक बदल निश्चितच होऊन येणा-या वर्षात बियाणे उगवणशक्तीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकेल,

सोयाबीन पिकासाठी १० ते २० टक्के अतिरीक्त बियाणे पुरवठा करावा

सर्वच पिकांच्या बियाणे पुरवठा नियोजन आराखडयाप्रमाणे करीत असताना राज्यासाठी विशेष बाब म्हणून सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणे पुरवठा करावा असे आवाहन दादाजी भुसे यांनी सोयाबीन बिजोत्पादक कंपन्यांना केले. महाबिज कंपनीव्दारे राज्यात सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे गतवर्षीप्रमाणेच ठेवले आहेत. त्यात दरवाढ करण्योत आलेली नाही. याबाबत खासगी कंपन्यांनी देखील पुढाकार घेऊन त्यांच्याकडील सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे शेतकरी बांधवांना परवडतील असे ठेवण्याबाबत आवाहन यावेळी त्यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com