पुणे (प्रतिनिधी) -

'पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिका म्हणून या परिस्थितीचा

विचार करता शहरातील आरोग्ययंत्रणा आणखीन क्षमतेने उभी करण्याकडे कल असून शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमधील खाटांची संख्या येत्या आठवडाभरात ५०० पर्यंत नेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

जम्बो रुग्णसेवेसाठी सुरु करण्यापूर्वी महापौर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आढावा घेतला. त्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'गेल्या वर्षभरात कोरोनाचा संसर्ग वाढता लक्षात घेता आठशे खाटांच्या क्षमतेचे जम्बो कोविड सेंटर उभारले होते, १५ जानेवारी २०२१ रोजी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने कोविड सेंटर बंद करण्यात आले होते, पण जर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला तर कमी वेळेत कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत सर्व व्यवस्था तयार ठेवली होती, 'अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

महापौर मोहोळ म्हणाले की, 'आज प्राथमिक स्वरुपात तातडीने जवळपास ५५ बेड्स सुरू करण्यात आले आहेत, त्यामध्ये २५ आॅक्सिजन बेड, २५ सीसीसी बेड व ५ आयसीयू बेड सुरू करण्यात आले आहेत. तसेच येत्या आठवडाभरात एकूण ५०० बेडस निर्माण केले जाणार आहेत. यामध्ये २५० आॅक्सिजन बेड, २०० सीसीसी बेड व ५० आयसीयू बेड असणार आहेत.

यामधील येत्या बुधवारी (२४ मार्च) १०० आॅक्सिजन बेड, ७५ सीसीसी बेड व २० आयसीयू बेड निर्माण होणार आहेत, तर शुक्रवारी(२५ मार्च) १२५ आॅक्सिजन बेड, १०० सीसीसी बेड व २५ आयसीयू बेडस निर्माण केले जाणार आहेत.'

'कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे, पुणेकरांनी काळजी घेतली पाहिजे तसेच सुचना व नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. जम्बो कोविड सेंटर त्यावेळी बंद न करण्याचा निर्णय योग्यच होता असे प्रतिपादन महापौर मोहोळ यांनी केले.'