
मुंबई | Mumbai
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडी येथे काल रात्री साडे दहाच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३० ते ४० घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे सांगितले जात आहे. तसेच या घरांमधील १०० पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे...
घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. याठिकाणी नेमके काय घडले याबाबतची याच गावातील ग्रामस्थांनी दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
इर्शाळगडाच्या आसपासच्या परिसरातदेखील जोरदार पाऊस सुरु आहे. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावामध्ये राहणारे काही गावकरी या पावसामध्येच मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी केल्यानंतर गावकरी रात्री उशिरा आपल्या घराकडे परतत होते.
साधारण ११ वाजेच्या सुमारास डोंगराचा काही भाग खचत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच डोंगराचा काही भाग इर्शाळवाडीतील घरांवर पडल्याचे त्यांना दिसले.
गावकऱ्यांनी वेळ न घालवता गावातील सरपंच आणि इतर गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीतात्काळ स्थानिक पोलीस आणि तहसील कार्यालयाला याची माहिती दिली.
या घटनेची माहिती कळताच इर्शाळवाडीमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपले नातेवाईक ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे सर्वांनी आक्रोश केला. रात्री १२.३० वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मदतकार्यासाठी एकापाठोपाठ एक सर्व पथक दाखल झाले. अग्निशमन दल, एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री २.४५ वाजता बचावकार्य सुरु केले.
या घटनेत आतापर्यंत सात जणांचे मृतदेह मलब्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला, पुरुष, लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक, पाळीव प्राणी ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. त्यांच्या वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.