Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेच्या बचावकार्याचा चौथा दिवस, मृतांची संख्या २९ वर

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेच्या बचावकार्याचा चौथा दिवस, मृतांची संख्या २९ वर

मुंबई । Mumbai

रायगड जिल्ह्यातल्या खालापूरजवळच्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Landslide) बुधवारी दरड कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले. या दुर्घटनेचा आज चौथा दिवस आहे. घटनास्थळावर गेल्या चार दिवसांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २९ वर पोहचला आहे. अद्याप ७८ जण बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढू शकते.

मदत कार्यात पावसाचा व्यत्यय येऊ लागला आहे. या दुर्घटनेतील चार जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. सततच्या पावसामुळे शोधकार्यात प्रचंड अडचणी येत असून यंत्रसामग्रीची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि मोठमोठी झाडे सर्वत्र पसरल्याने मदतकार्य कठीण बनले आहे. राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाचे जवान,'एल अँड टी'चे कामगार, अपघातग्रस्त मदत पथक, स्थानिक तरुण, इर्शाळवाडीतील ग्रामस्थ आणि कोल्हापूर व्हाइट आर्मीचे जवान मृतदेह गाडल्या गेलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी तिसऱ्या दिवशीही राबत होते. दुर्घटना होऊन तीन दिवस झाल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधित व्यक्तींची संख्या अंतिम करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर एकूण लोकसंख्या, कुटुंबसंख्या, घरे, जनावरे, मयत आणि बेपत्ता व्यक्ती यांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेतून वाचलेल्या दरडग्रस्तांना सध्या पंचायतन मंदिर नढाळ येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय वाडीतील ३१ विद्यार्थी विविध आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने ते या दुर्घटनेतून बचावले. तसंच नातेवाईकांकडे काही कारणानिमित्त गेलेल्या १६ जणांचेही या दुर्घटनेतून प्राण वाचले आहेत. येथील नागरिकांसोबतच इर्शाळवाडीत काही प्रमाणात पाळीव जनावरांनाही आपले प्राण गमावावे लागले. त्यामध्ये ४ बैल, ३ शेळ्या यांचा समावेश आहे. सध्या दरडग्रस्त कुटुंबांना तात्पुरत्या निवासासाठी सूर्या हॉटेलसमोर चौक येथे ३४ पोर्टेबल कंटेनर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com