
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) राज्यातील अनेक भागांत दडी मारल्याने शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. यंदा देशात मान्सूनवर अल निनोचा (El Nino) प्रभाव दिसून आल्याने जून आणि ऑगस्ट महिन्यात पाहिजे तितक्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. यानंतर जुलै महिन्यात (July Month) बऱ्यापैकी चांगला पाऊस बरसला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यात खरीप हंगाम घेतला गेला. मात्र, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात (August Month) पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्यात (September Month) तरी चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यातच आता हवामान विभागाने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून ६ आणि ७ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. या दोन्ही दिवस विदर्भातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस होणार आहे. तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून वारे सक्रीय होणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.
दुसरीकडे राज्यातील इतर जिल्ह्यांसोबतच नाशिक जिल्ह्यात (Nashik District) देखील पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट ओढवले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये (Dam) गेल्यावर्षी पेक्षा यंदा २५ टक्के कमी पाणीसाठा असून या धरणांमध्ये यंदाच्या वर्षी केवळ ५९ टक्के जलसाठा आहे. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) ८३ टक्के पाणीसाठा आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने येथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पंरतु, सिन्नरसह (Sinnar) इतर तालुक्यांमध्ये पाण्याचा एकही थेंब न पडल्याने याठिकाणी आतापासूनच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागून राहिल्या आहेत.