माळा काढणार्‍यांसाठीच तिसरी लाट - इंदोरीकर महाराज

माळा काढणार्‍यांसाठीच तिसरी 
लाट  - इंदोरीकर महाराज

लातूर | Latur

देशात करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून याआधी आलेल्या दोन लाटांमध्ये फार मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. दुसर्‍या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, दुसर्‍या लाटेतून वाचलो असल्याने तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत. तुमचा आणि माझा जन्म नाही तर पुनर्जन्म आहे असं वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलं आहे. लातूरमध्ये आयोजित किर्तनात बोलताना त्यांनी तिसरी लाट माळा काढणार्‍यांसाठीच असल्याचंही म्हटलं.

गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकर्‍याची आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया जात नाही. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकर्‍याच्या पाया पडलोय, कीर्तनकाराच्या पुढे वाकलोयते पुण्य आपल्याला 2021 मध्ये कामाला आलं. त्यामुळे हसत हसत जगा. आता भांडणं करण्यात मजा नाही. गळ्यात हात घालून फिरण्याची गरज नाही, असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, आता सगळं क्षणिक आहे. उद्याचं किर्तने होईल का याची शाश्वती नाही. आता खोकला का ठोकला, असा जीआरच देवानं काढलाय. काही लोकं खोकला दाबून मेली, पण खोकली नाहीत. त्यामुळे आनंदानं, हसत हसत जगा.

दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? 80 टक्के भजनं, हरिपाठ विसरले. 40 टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? 40 टक्के माळकर्‍यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकर्‍यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणार्‍यांसाठीच असणार, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी मन खंबीर ठेवणं हेच करोनावरील औषध असल्याचं म्हटलं.

हसत हसत जगा!

डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवेल? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले, असे सांगितले. यावेळी त्यांनी हसत हसत जगा असा उपदेशही दिला. पैशाचा देखील या करोना काळात काही उपयोग झाला नाही हे सांगताना यमानं जर लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता. पण यमानं लाच घेतली नाही असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com