कोव्हिड योद्ध्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र

कोव्हिड योद्ध्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्ती कसे करता येईल याकडे लक्ष : मुख्यमंत्री

Kishor Apte

Kishor Apte

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, परिचारिका उपस्थित होते. “डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत” अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले. यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 150 टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे .त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल.शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे 29 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 980 कोटी रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त करण्यात आले आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे 418 लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी शासनाने केलेली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,किसान हरितक्रांती करतात तर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. त्याचबरोबरीने आपले कामगार सुद्धा उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळत असतात.म्हणून कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल.अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 'महाजॉब्ज' हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होईल.जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल.

ऑनलाईन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात सध्या सुमारे 50 ते 60 हजार उद्योग सुरू झाले आहेत. उद्योग क्षेत्रात 12 देशांमधील गुंतवणूकदारांसोबत सुमारे 16 हजार कोटीं रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स,नर्सेस, इतर वैद्यकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हेच खरे कोविड योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत. त्यांचे मी कौतुक करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले काम चोखपणे बजावले.पण हे करताना काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाला बळी पडले. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अहोरात्र आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या जवानांच्या कामगिरीचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना त्यांनी अभिवादन केले.राज्यातील राष्ट्रपती पदक, शौर्यपदक आणि प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. दरम्यान मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांनी कोविड योध्दांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

कोरोनाच्या कालावधीत सर्व धर्मीयांचे महत्त्वाचे सण-उत्सव येऊन गेले आणि पुढेही ही येत आहेत. मात्र सर्वांनीच संयम बाळगून, नियमांचे पालन करून, शांततापूर्वक हे सणवार साजरे केले आणि देशासमोर एक आदर्श उदाहरण उभे केले. त्यांचे देखील या निमित्ताने मी मनःपूर्वक आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेकिंग , ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटला वेग दिला आहे. राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात रुग्ण सुविधांची उभारणी वेगाने सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी रुग्ण वाढीचा वेग काहीसा कमी झाला आहे.कोरोनाविरुद्धचा लढा हा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. कोरोनावर आतापर्यंत लस आलेली नाही. परंतु सुरक्षित अंतर ठेवणे, स्वयंशिस्त, स्वच्छता पाळणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे या उपायांद्वारे आपल्याला हे संकट परतवून लावायचे आहे. पुनश्च हरिओम करून आपण अतिशय सावधपणे हळूहळू अनेक गोष्टी पुन्हा सुरू करत असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

शासनाने साडेचार कोटी लिटर दुधाचे रूपांतर भुकटीत केले. आदिवासी मुले व महिलांना ही दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली खावटी योजना सुरू करण्यात आली असून 100 टक्के अनुदान म्हणून 2 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतील आदिवासींना दिलासा मिळणार आहे. कोरोनाचे संकट असतानाही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसमृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा महामार्ग केवळ रस्ता असणार नाही तर या महामार्गाच्या दुतर्फा अनेक सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे हा महामार्ग खऱ्या अर्थाने समृद्धी आणल्याशिवाय राहणार नाही.

मनोगतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com