Rain Alert : बळीराजा चिंतातूर! पुन्हा थैमान घालणार अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

Rain Alert : बळीराजा चिंतातूर! पुन्हा थैमान घालणार अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई | Mumbai

गेल्या महिनाभरापासून राज्यातील तापमानात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी पावसाच्या सरी तर कधी कडाक्याच्या उन्हाच्या झळा बसत आहे. एप्रिल महिना संपत आला तरी, अजूनही राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे.

एकीकडे अवकाळीचं संकट पाठ कधी सोडणार? याची वाट बळीराजा पाहत असताना दुसरीकडे चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी (Rain Alert) पोषक वातावरणाची निर्मिती होत असून, वादळी पाऊस हजेरी लावणार आहे. पश्‍चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आलेला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुक्रवारी सकाळी पावसाला सुरुवात झालीय. मावळ तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान सुरु आहे. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. यामुळे मतदारांची तारांबळ उडाली. पावसाचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील हडपसर ,स्वारगेट, कात्रज या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.

नगर जिल्ह्यात बुधवारी (दि.26) राहुरी, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात चार गावांत 292 शेतकर्‍यांचे 120.7 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. यासह राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यात काही घरांचे नुकसान झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बुधवारी सायंकाळी राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळीने हजेरी लावली. यात श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यात वीज पडून चौघांचा बळी गेला. तर राहुरी तालुक्यातील एका गावात 7 शेतकर्‍यांचे 3.7 हेक्टरवरील पिकांचे, पाथर्डी तालुक्यातील दोन गावात 230 शेतकर्‍यांचे 95 हेक्टरवरील पिकांचे आणि शेवगाव तालुक्यातील एका गावात 55 शेतकर्‍यांचे 22 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यासह वादळामुळे श्रीरामपूर तालुक्यातील 10 घरांची पडझड झाली असून राहुरी तालुक्यातील 4 घरांची पुर्णपणे तर 206 घरांची अंशत: पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com