
मुंबई | Mumbai
राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीने (Hail) चांगलंच झोडपलं आहे.
या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील ५ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर १२ ते १४ या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रविवार, ९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अहमदनगर, धाराशीव आणि नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.