
मुंबई | Mumbai
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पावसासोबत पुणे आणि मुंबईत उष्णतेचा पारा वाढल्याने उकाडा देखील वाढणार आहे. असे असताना मुंबई आणि पुण्यात आज हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मार्च महिना अवकाळी पावसात गेला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच मार्च महिन्याच्या मध्यानंतर राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी पुण्याचा पारा हा ४० पर्यन्त पोहचला होता. तर मुंबईतही उष्णतामान वाढले होते. दरम्यान, या तापमानात पुढच्या दोन दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना सध्या नागरिक करत आहे. दिवसभरात तापमानात तब्बल २० ते २५ अंशांचा फरक पडत असल्यामुळे अनेक नागरिक हैराण झालं आहेत. अशातच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने नागरिकांना आरोग्याची भीती वाटत आहे.
जिल्ह्यावर ‘अवकाळी’चे संकट
भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेत दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये.
सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणार्या / लोंबणार्या केबल्स्पासून दूर रहावे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
शेतकर्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.