पुणे (प्रतिनिधि) -

सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवले पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका

आहे. हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथे स्रीयांचा सन्मान झालाच पाहिजे असे सांगत खरोखरच संजय राठोड चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मागील काही दिवसांपासून पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे. या प्रकरणात वनमंत्री व संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी देखील केली आहे. आता यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, एखाद्या महिलेबाबत कमी जास्त काही घडलं असे तर त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि त्याला कोणाचाही विरोध असता कामा नये मात्र, यापूर्वीच्या सरकारच्या काळात मंत्र्यांवर असेच झाले होते. ते राठोडांचा राजीनामा मागतात त्यावेळी आधीच्या सरकारच्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यावर त्यांची भूमिका वेगळी भूमिका वेगळी का होती? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी याचे उत्तर आधी द्यावे, ‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडं मारू नये’ असा टोला शेट्टी यांनी भाजपला लगावला.

उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेले वाहन आढळले त्याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन केंद्राने पारित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात आहे. या कायद्यांमुळे अन्नधान्याचा व्यापार 10-20 लोकांपूरता मर्यादित होणार आहे. त्यामध्ये अदानी आणि अंबानी यांची नावे हे आघाडीवर आहेत. अंबानी यांच्या घरासमोर नेमकी याचवेळी स्फोटके सापडतात म्हणजे हे मुद्दामहून घडवून आणले आहे का? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. जी व्यक्ति शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या रोषास पात्र ठरते त्याच्याबद्दल सहानुभूति निर्माण करण्यासाठी घडवून आणलेलं हे षड्यंत्र आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. एवढी स्फुटके मुंबईत येताना केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि केंद्रीय पोलिस काय करीत होते? असा सवाल करून अशाप्रकारे स्फोटके घराजवळ आणून अदानी- अंबानींना सहानुभूती मिळेल असे त्यांनी समजण्याचे कारण नाही असे शेट्टी म्हणाले.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला तीन महीने झाले आहेत. 3 महीने एका ठिकाणी शेतकरी बसून राहतात म्हणजे त्यांच्या काहीत वेदना आहेत हे सरकार समजून घेणार नाही का, की आम्ही समजून घेणार नाही, आमचे काही अडत नाही, आंदोलन मोडीत काढू, शेतकाऱ्यांकडे लक्ष देणार नाही असेच सरकार महान्त असेल ती दुर्दैवाची गोष्ट आहे असे म्हणत आम्ही आता काय करावं या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावे असे ते म्हणाले.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसून हिंसाचार करणारे जे लोक होते त्यांना आंदोलकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले त्या तपासाचे काय झाले? हे सरकारने सांगावे हिंसाचार करणारे आंदोलनात घुसवायचे आणि आपणच आंदोलक शेतकऱ्यांना खलीस्तावादी किंवा आतंकवादी ठरवायचे हे धंदे बंद करा असा टोला त्यांनी लगावला.