मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरु

ओबीसी संघर्ष सेनेचा इशारा
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरु

पुणे(प्रतिनिधि)

मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा- ओबीसी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी संघर्ष सेनेने दिला आहे. याबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असे ओबीसी संघर्ष सेनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान,केंद्र सरकारच्या आर्थिक मागासांच्या आरक्षणात उपगट करून त्यामध्ये मराठा समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, असेही अशी सूचना त्यांनी केली आहे.

ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेमध्ये आरक्षणासंदर्भात आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप गुरव, यवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव, रामदास सुर्यवंशी, आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते. हाके म्हणाले, ‘मराठा समाजाला ओबीसी मधून पाच टक्के आरक्षण द्यावे, अशी भूमिका मराठा नेत्यांकडून मांडली जाऊ लागली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही ओबीसींनी मन मोठे करावे, असे म्हटले आहे. कोल्हे यांनी आधी गावगाड्याचा अभ्यास करून बोलावे. ओबीसींच्या आरक्षणाला आम्हा धक्का लावू देणार नाही.’

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या पध्दतीने मागासवर्गीय आयोग नेमला. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या मागदर्शक तत्वांनुसार काम केले नाही. आयोगाच्या बोगस अहवालावर मराठा समाजाला दिलेले आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपणही नाकारले आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागणे त्यांच्या प्रतिमेला शोभणारे नाही. आरक्षण गरीबी हटविण्यासाठी नसून शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दुर करण्यासाठी आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षणाची भुमिका घेतल्यास राज्यातील ५२ टक्के ओबीसी मतदानावर बहिष्कार टाकतील. रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल,’ असे हाके यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज जनतेला देणारे होते. आताचे छत्रपती आमच्याकडूनच घेत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मागणे चुकीचे आहे. आरक्षणासंदर्भात काहींचा संयम सुटत चालला आहे. ओबीसींबद्दल चुकीची भाषा वापरली जात आहे, असे प्रताप गुरव यांनी नमुद केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com