
मुंबई | Mumbai
गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये देशात चांगला पाऊस झाला होता. अनेक राज्यांमध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला होता. महाराष्ट्रात ही गेल्या ५ वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक पावसाची नोंद गेल्या वर्षी झाली होती. अनेक ठिकाणी तर अतिवृष्टी ही झाली होती. मात्र यंदाचा पाऊस कसा असणार आहे. याबाबत स्कायमेटने अंदाज वर्तवला आहे....
राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांसोबत सर्वांचीच दाणादाण उडवली आहे. शेतकऱ्यांचे तर अतोनात नुकसान झाले आहे. त्यात आता स्कायमेटने अंदाज (Skymate Monsoon Forecast) वर्तवल्यानुसार शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे.
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटने प्रसिध्द केलेल्या त्यांच्या अहवालात ही माहिती प्रसिध्द केली आहे.
स्कायमेटकडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ९४ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेट या खासगी संस्थेच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस 858.6 मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे.
देशाच्या मध्य आणि उत्तर भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एल निनोचा (Al Nino) परिणाम यंदा कमी राहाणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या हवामान एजन्सी असलेल्या एनडब्ल्युएस ने ही वर्तवला आहे. आणि त्यात आता स्कायमेटने देखील कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
परंतू, भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) त्यांचा अंदाज अद्याप वर्तवलेला नाही आहे. भारतीय हवामान विभाग त्यांचा अंदाज पुढच्या आठवड्यात जाहीर करेल त्यानंतर एल निनो कसा असेल त्याबाबतची माहिती समोर येईल. यासोबतच हवामान खाते त्यांचा पुढील अंदाज मे महिन्याच्या शेवटी सांगतील त्यावर ह्यावर्षीचा पाऊस कसा असेल हे नेमके समजेल.
स्कायमेट म्हणजे काय?
स्कायमेट हवामान ही भारतातील सर्वात मोठी हवामान निरीक्षण आणि कृषी-जोखीम समाधान कंपनी आहे. स्कायमेट ही भारतातील एकमेव खाजगी हवामान अंदाज एजन्सी आहे. स्कायमेट वेदरची स्थापना २००३ साली झाली होती. तेव्हापासून ती विश्वसनीय आणि प्रवेशयोग्य हवामान अंदाज प्रदान करण्यासाठी ओळखली जाते.
स्कायमेट स्वतःचे अंकीय हवामान मॉडेल चालवते आणि डेटा आणि माहिती साधनांद्वारे हवामान-आधारित सेवा प्रदान करते. हे ऊर्जा कंपन्या, मीडिया समूह, शेतकरी नवोपक्रम सेवा, कृषी निविष्ठा उत्पादक आणि लॉजिस्टिक ऑपरेटर यांना हवामानाचा अंदाज देण्यासाठी नवकल्पना वापरते. भारतातील लांब पल्ल्याचा मान्सून हवामान अंदाज, उपग्रह रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि मानवरहित हवाई वाहनांसाठी याने पायनियर वापर केला आहे.