भाजप नेते स्वतंत्रपणे ‘रेमडेसिवीर’ कसं खरेदी करतात? नविन कायदा आलाय का? - जयंत पाटील

भाजप नेते स्वतंत्रपणे ‘रेमडेसिवीर’ कसं खरेदी करतात? नविन कायदा आलाय का? - जयंत पाटील

मुंबई -

करोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनचा एकीकडे तुडवडा असताना ब्रुक फार्मा कंपनीमार्फत रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला पुरवठा करण्यावरुन जोरदार राजकारण रंगलं आहे.

या राजकारणातच ‘रेमडेसिवीर’ अडकले असताना शाब्दिक चकमक सुरु आहे. रेमडेसिवीरचा साठा मुंबईबाहेर पाठवण्याच्या संशयातून रेमडेसिवीर औषधाची निर्यात करणार्‍या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.

त्यांना सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत आहोत, असं म्हटलं.

तसंच काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते दमणला जाऊन आले आणि 50 हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन आम्ही महाराष्ट्रात वाटू असं म्हटलं होतं. यावरुन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

रेमडेसिवीर सारखं लोकांचे प्राण वाचवणारं औषध भाजचे नेते राज्य सरकारला, स्थानिक अधिकार्‍यांना आणि पोलिसांना माहिती न देता खरेदी करु शकतात का? नविन कायदा आला आहे का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पोलिसांचं कौतुक देखील केलं. पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com