पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी

पुणे(प्रतिनिधी)

भगव्या टोप्या, भगवे झेंडे, जय श्रीराम आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषणा अशा वातावरणत निघालेल्या मोर्चाच्या माध्यमातून रविवारी पुण्यात अखिल हिंदू समाजाची एकजूट दिसून आली. हजारोंच्या संख्येने यावेळी हिंदू बांधव मोर्चात सहभागी झाले होते. विविध संघटना, राजकीय पक्ष व संस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणजे फाल्गुन अमावस्या धर्मवीर दिन जाहीर करावा तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती घराण्याचे वंशज आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. मोरे, हिंदुत्ववादी नेते धनंजय देसाई आणि तेलंगणाचे आमदार राजा सिंह उर्फ राजा भैया यांची मोर्चात प्रमुख उपस्थिती होती.

लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती येथे महाआरती केल्यानंतर हा मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गे डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आला. तेथे झालेल्या सभेनंतर मोर्चाचे समापन झाले.

यावेळी झालेल्या सभेत बोलताना आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले, "आज या मोर्चाच्या रूपाने मला हे भगवे वादळ दिसत आहे. हिंदू धर्मातील सर्व जाती पातीचे लोक आज एकत्र आले आहेत. हिंदू धर्माचे रक्षण झाले पाहिजे हीच आपली सर्वांची भावना असून देव, देश आणि धर्माच्या रक्षणात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. आता एकत्र आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आम्ही कोणाचाही द्वेष करायला एकत्र आलेलो नाही. म्हणूनच आम्ही कोणाच्याही विरोधात घोषणा दिल्या नाहीत."

महापुरुषांच्या इतिहासाबाबत वक्तव्ये करणाऱ्यांचा समाचार घेताना ते म्हणाले, की आपलं मतदान टिकले पाहिजे, राजकारण झालं पाहिजे म्हणून काही जण बालिश वक्तव्ये करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतीस्थळ हे पर्यटनस्थळ म्हणून जाहीर न करता तीर्थस्थळ म्हणून जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

धनंजय देसाई यांनी सर्वांना एकजूट राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की भक्तिवाचून धर्म दुष्ट ठरतो आणि शक्तिवाचून धर्म दुर्बळ ठरतो. म्हणून आपली एकजूट हीच शक्ती आहे.

राजा सिंह ठाकूर म्हणाले, हा आक्रोश नसून हिंदूंची गर्जना आहे. महाराष्ट्रातील मावळ्यांमध्ये जेवढे हिंदुत्व दिसते तेव्हढे अन्य कुठेही दिसत नाही. धर्मांतराच्या विरोधात लढणे हे आपले सर्वांचे परम कर्तव्य आहे. आता प्रत्येक हिंदूला सैनिकाप्रमाणे सज्ज व्हावे लागेल. संपूर्ण भारतात लव्ह जिहादचे कारस्थान पसरत आहे. लिव्ह जिहादच्या विरोधात देशात कायदा बनला पाहिजे.

आम्हाला कोणाशीही संघर्ष करायचा नाही कारण भारतात सुख व शांती नांदावी हीच आमची इच्छा आहे. गोहत्येबाबत ते म्हणाले की गाय ही आमची माता असून आम्ही गाईची कत्तल होऊ देणार नाही. ज्या पुण्येश्वर मंदिरावरून पुण्याचे नाव पडले ते मंदिर अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा. तेथे महाआरती झाली तर मी सर्वात आधी येईन, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com