पंचनामे पूर्ण होताच नुकसानग्रस्तांना मदत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंचनामे पूर्ण होताच नुकसानग्रस्तांना मदत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन नुकसानीची घेतली माहिती

मुंबई । प्रतिनिधी

तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर आढावा घेवून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

उद्धव ठाकरे यांनी आज चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांना भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली. आंबा उत्पादक शेतकरी, मच्छीमार तसेच नागरिकांच्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ठाकरे यांनी मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले.

आपत्तीच्या मदतीसाठी केंद्राकडून राज्याला जास्तीत जास्त मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना ठाकरे यांनी बदलत्या हवामानामुळे समुद्रिय वादळांचा धोका वाढला आहे. भविष्यात वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल याबाबत उपाययोजना केल्या जातील, असेही सांगितले.

रत्नागिरी जिल्हयात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारी सह प्रस्ताव सादर करा, असे ठाकरे यांनी रत्नागिरीच्या आढावा बैठकीत दिले.

चक्रीवादळाने रत्नागिरीत मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे १ हजार १०० शेतकऱ्यांचे साधारण २ हजार ५०० हेक्टर इतके नुकसान झाले. यापैकी ८१० हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि स्थानिक आमदार उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com