चक्रीवादळातील मृतांच्या वारसांसाठी मदत

मदत तातडीने वितरित करण्याचे आदेश जारी ; २ कोटीचा निधी वितरित
चक्रीवादळातील मृतांच्या वारसांसाठी मदत

मुंबई । प्रतिनिधी

तौक्ते चक्रीवादळ तसेच इतर नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ९६ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास गुरुवारी राज्य सरकारने मान्यता दिली.

दोन दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाने राज्यातील सात जिल्ह्यांना जबरदस्त तडाखा दिला. या वादळात अनेकजण मृत्युमुखी पडले. तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील आंबा पिकाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

या पार्श्वभूमीवर तौक्ते चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना, जखमींना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तातडीने आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत वितरित करण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाने घेतला आहे.

त्यानुसार मुंबई उपनगर विभागात १६ लाख २० हजार, मुंबई शहर विभागात ४ लाख रुपये, ठाणे, पालघर जिल्ह्याला प्रत्येकी १२ लाख रुपये, रायगड १६ लाख रुपये, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याशिवाय पुणे, नाशिक, मराठवाडा विभागासाठीही स्वतंत्र रक्कम वितरित करण्यात आली आहे. ही रक्कम विनाविलंब वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com