
मुंबई | Mumbai
दहीहंडी दिवशीच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईसह शहर परिसरात दहीहंडीचा उत्सव चालू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आता राज्यतील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या महिन्यात राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला तर रब्बी हंगामाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि पुण्यात पहाटेपासून तर विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. या सोबतच राज्यात नऊ आणि दहा तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. तसेच, कोकण, गोवा, मुंबई आणि पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. तर राज्याच्या संपूर्ण विभागात विजांच्या कडकडाट आणि मेघवर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.