आरोग्य विभागात 2200 हून अधिक पदांची जम्बो भरती, श्रीरामपूर उपकेंद्राचाही समावेश

आरोग्य विभागात 2200 हून अधिक पदांची जम्बो भरती, श्रीरामपूर उपकेंद्राचाही समावेश

मुंबई | Mumbai

राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 118 नविन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या आरोग्य संस्थांसाठी 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा असे एकूण 2222 पदे उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत होईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

रुग्णसेवा पुरविण्यासाठी या रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्यास मान्यता मिळाली असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.

पालघर येथे नविन जिल्हा रुग्णालयासाठी 355 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. सातारा, औंरंगाबाद, बुलढाणा, नागपूर, अहमदनगर, जालना, नंदुरबार, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद, पालघर, चंद्रपूर आणि पुणे या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात 47 नविन उपकेंद्र तयार करण्यात आले आहेत.

37 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आली असून त्यासाठी 185 नियमीत पदे तर 370 इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहा नविन ग्रामीण रुग्णालयांसाठी 60 नियमीत आणि 96 इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येणार आहे. सोलापूर, बुलढाणा, सातारा, नाशिक, पुणे, नांदेड येथे हे नविन ग्रामीण रुग्णालये करण्यात आली आहेत. लोहा (नांदेड), शिराळा (सांगली), श्रीरामपूर (अहमदनगर), कोरेगाव (सातारा), तिवसा (अमरावती) या पाच ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात आले असून त्यासाठी 100 पदांकरीता मान्यता देण्यात आली आहे.

चार नविन स्त्री रुग्णालये

यासोबतच रत्नागिरी, वर्धा, जळगाव आणि यवतमाळ येथील चार नविन स्त्री रुग्णालयांसाठी 168 नियमीत पदे आणि 220 इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येतील. ग्रामीण भागातील कुटीर रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांच्या खाटांचे श्रेणीवर्धन देखील करण्यात आले असून त्यासाठी वाढीव पदांसाठी मान्यताही देण्यात आली आहे.

प्राथ.आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णांलयांमध्येही पदे

ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम 75 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच काम पूर्ण झालेल्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असणार्‍या पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com