‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत घेतला बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप

‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत घेतला बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप

पुणे |प्रतिनिधी| Pune

‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद होत आहे. तशातच आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी या चित्रपटाबाबत आक्षेप घेतला आहे. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापरही जबाबदारीने होणे अपेक्षित आहे. ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनाही या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. चित्रपट निर्मितीसाठी मुभा घेणे (सिनेमॅटिक लिबर्टी) ही काल्पनिक चित्रपटांसाठी घेणे ठीक. मात्र, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी ती घेणे योग्य नाही, असा आक्षेप प्रा. रुपाली देशपांडे यांनी नोंदवला आहे.

'हर हर महादेव' या चित्रपटावर झालेल्या टीका आम्ही पाहिल्या आहेत. आम्ही स्वतः हा चित्रपट पाहिला आहे. 'सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली जे दाखवले आहेत त्यातील काही गोष्टींचा आम्हाला आक्षेप आहे," असे रुपाली देशपांडे म्हणाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडून शिवाजी हा एकेरी उल्लेख वारंवार दाखवण्यात आलाय. ही अत्यंत खटकणारी गोष्ट आहे. ते तसा उल्लेख टाळू शकले असते.

हिरडस मावळ येथील समुद्र किनारा दाखवला आहे. प्रत्यक्षात तिथे शिरवळला नीरा नदी आहे. आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना इंग्रज घेऊन जात आहेत, असं दाखवलंय. त्या काळात खरच मावळमध्ये इंग्रजांचं प्राबल्य इतकं होतं का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आम्हीही इतिहास तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांचंही हेच मत आहे.

बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे सख्खे भाऊ. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली एक तंटा दाखवलं आहे. फुलाजी प्रभूंनी  विश्वासघात केल्याचं म्हटलंय. यामुळे फुलाजी प्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. हे दोघेही बंधू स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले, असे त्या म्हणाल्या.

सिनेमॅटिक लिबर्टी असावी. काल्पनिक कथेत ती असते. पण ऐतिहासिक गोष्टी बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे चुकीचं आहे. त्यामुळे अनेक चित्रपट काढणाऱ्यांनाही संभ्रम होऊ शकतो.अफजलखानाचा वध झाला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे हे हजर नव्हते. पण चित्रपटात हा सीन दाखवला आहे की ते हजर आहेत. हे इतिहासाला धरून आहे का? की त्या वेळी बाजीप्रभू देशपांडे आणखी काही मोहिमेवर होते?

"आम्हाला चित्रपटाच्या टीममधून कोणीही हा सिनेमा दाखवला नाही. चित्रपटाला आमचा विरोध नाही पण यातील काही सिनबद्दल आम्हाला आक्षेप आहे. याबाबत आम्ही कारवाई करण्याच्या विचारात आहोत, पण आधी आम्ही संवाद करण्याचे ठरवले आहे. त्यांना कायदेशीर अर्ज देणार आहोत. बांदल यांच्याशी देखील संपर्क करू," असे देशपांडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com