छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे 'हिरो'

राज्यपाल कोश्यारी यांनी केली सिंहगडाची पाहणी
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे 'हिरो'

पुणे |प्रतिनिधी| Pune

आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदूची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे 'हिरो' आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यानी काढले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी किल्ले सिंहगडाला भेट देवून पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

राज्यपाल कोश्यारी याप्रसंगी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान व स्वाभिमान आहेत. त्यांच्या सारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.

कोश्यारी यांनी सुरवातीला लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामास भेट देवून माहिती जाणून घेतली. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. किल्ले सिंहगड व परिसराची माहिती डॉ. नंदकिशोर मते यांनी राज्यपालांना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com