सचिन वाझे प्रकरणी सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही

- उपमुख्यमंत्री अजित पवार
सचिन वाझे प्रकरणी सरकार कोणालाही पाठीशी  घालणार नाही

मुंबई । प्रतिनिधी

सचिन वाझे प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्‍याच्यावर योग्‍य ती कारवाई करण्यात येईल.या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केले.

कोणाच्याही मंत्रिपदाबाबतचा निर्णय आघाडीचे सर्वोच्च नेते सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेत असतात, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

कोणत्‍याही प्रकरणाची योग्‍यरित्‍या चौकशी झाली पाहिजे. यात कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. महाविकास आघाडी सरकार तसे अजिबात होऊ देणार नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी एनआयए आणि एटीएस या दोन यंत्रणांमार्फत सुरू आहे. त्‍यात ज्‍या घटना पुढे येतील त्‍यानुसार कारवाई होत राहिलच, असे पवार म्हणाले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशलमिडियावर काही चुकीच्या कमेंटस होत्‍या. अधिवेशनात ही बाब पुढे आल्‍यानंतर तातडीने कारवाई करत त्‍याच संध्याकाळी संबंधिताला अटक करण्यात आली होती. त्‍याच पद्धतीने या प्रकरणातही दोषीवर कारवाई होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com