रेमडेसिवीरच्या आरोपांबाबत पुरावे द्या

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना आव्हान
रेमडेसिवीरच्या आरोपांबाबत पुरावे द्या

मुंबई । प्रतिनिधी

रेमडेसिवीरच्या बाबतीत राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय रसायन, खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत त्या 16 कंपन्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. मलिक यांनी हे आव्हान स्वीकारावे. आरोपांबाबत मलिक यांनी पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, आव्हान विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी दिले.

रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्रास करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने घाणेरडे राजकारण थांबवून महाराष्ट्राची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली .

रेमडेसिवीर औषधाच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नसल्याचे रेल्वेमंत्री गोयल यांनी आकडेवारीनुसार दाखवून दिले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने या विषयावर चालू केलेले निर्लज्ज राजकारण थांबवावे, अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी आज प्रसिद्धी पत्रक काढले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत ऑक्सिजन, रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत वस्तुस्थिती मांडली आहे. केंद्राने महाराष्ट्राला ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा केल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

देशात क्षमतेच्या 110 टक्के एवढे ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालयाने ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत केंद्रावर आरोप केल्यानेच गोयल आणि मांडवीय यांना ट्विटद्वारे ही माहिती द्यावी लागल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लसीकरणाबाबत आकडेवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे सरकारला गप्प राहावे लागले. एखादी जबाबदारी पेलवली नाही की सरळ केंद्रावर आरोप करायचे ही ठाकरे सरकारची सवयच आहे. ठाकरे सरकारने आता तरी केंद्रावर खापर फोडण्याचे घाणेरडे राजकारण थांबवावे असा सल्लाही दरेकर यांनी दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com