
टिटवाळा | Titwala
काही दिवसांपूर्वी दिल्लीत श्रद्धा वालकर हिची तिच्या लिव्ह इन पार्टनर आफताबने (Aaftab Poonawalla) हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. आता महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे...
प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार करुन निर्घृण हत्या केली आहे. कल्याण ग्रामीण हद्दीत येणाऱ्या टिटवाळा येथील गोविली जंगलात ही घटना घडली घडली आहे. जयराम चौरे असे संशयिताचे नाव आहे. चौरे याने त्याच्या मित्राच्या मदतीने प्रेयसी रुपांजली जाधव हीची हत्या केली.
या दोघांचे विवाहबाह्य संबध होते. रुपांजली ही विवाहित होती. दोघेही पुण्यात राहत असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेम संबंधांमध्ये झाले. रूपांजली जयरामकडे सातत्याने लग्नाची मागणी करत होती.
जयरामने रुपांजलीला टिटवाळा येथे भेटायला बोलावले. मला जंगलात सोने सापडले असून तू पण चल असे सांगून त्याने तिला गोविलीच्या जंगलात नेले. येथेच जयरामने मित्राच्या मदतीने रुपांजलीवर धारदार शस्त्राने सपासप वार करुन तिची निघृण हत्या केली आणि जंगलातच तिचा मृतदेह फेकून फरार झाला.
स्थानिकांना रुपांजलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. अवघ्या २४ तासात कल्याण तालुका पोलिसांनी जयराम आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.