कबड्डीपटू 14 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या चौघांना अटक

कबड्डीपटू 14 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या  चौघांना अटक

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुण्यातील बिबवेवाडी भगात मंगळवारी एकतर्फी प्रेमातून १४ वर्षाच्या क्षितिजा अनंत व्यवहारे हिच्या मानेवर वार करुन खून करणार्‍या ऋषिकेश ऊर्फ शुभम बाजीराव भागवत (२१, रा. सुखसागर नगर) याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी रात्रीत अटक केली तर मुख्य आरोपी स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला आहे.

बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे सराव करत असलेल्या क्षितिजा व्यवहारे या १४ वर्षीय कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने वार करून तिचे शिर धडावेगळे करत खून करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली. तर, मुख्य आरोपी ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय २१, सध्या-रा. चिंचवड) हा स्वत: पोलिसांसमोर हजर झाला आहे.

शुभम भागवत हा क्षितिजा व्यवहारे हिचा नातेवाईक आहे. तो सुखसागरनगरला मावशीकडे राहून मिळेल ती कामे करत होता. तो क्षितिजा हिला गेल्या दीड वर्षांपासून त्रास देत होता. ही गोष्ट क्षितिजाच्या पालकांना समजल्यावर त्यांनी शुभम याला समज दिली होती. त्यानंतर तो चिंचवडला रहायला गेला होता.

त्यानंतर काल सायंकाळी तो दोन मित्रांना घेऊन यश लॉन्स येथील मैदानावर आला. त्याने क्षितिजाला बाजूला बोलाविले. तिने तू येथे काल आलास असे विचारल्यावर त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्याच्या साथीदाराने तिच्या पायावर वार केला. शुभम याने तिच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. तिच्या मैत्रिणी धावत तेथे आल्यावर त्यांनी खेळण्यातील पिस्तुलाने त्यांना धाक दाखवत हत्यारे तेथेच टाकून ते पळून गेले होते.

या प्रकारानंतर तिघेही जवळच्या झुडपात रात्रभर लपून बसले होते. बिबवेवाडी पोलिसांनी त्यांना पहाटे या झाडाझुडपातून शोधून तिघांना पकडले आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज घटना स्थळाला भेट दिली. प्रकरणातील मुख्य आरोपी स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला आहे. पोलिसांनी अन्य तीन जणांनाही अटक केली आहे. या प्रकरणी तातडीनं तपास करून, लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.