भविष्यातील नोबेल भारताला ‘दलित साहित्य’च देईल
महाराष्ट्र

भविष्यातील नोबेल भारताला ‘दलित साहित्य’च देईल

Balvant Gaikwad

जळगाव  –

तळागळातला शेवटचा माणूस दलित साहित्याचा नायक आहे. त्यामुळेच जगातल्या सर्वात्कृष्ट साहित्यात दलित साहित्य मोडत असल्यामुळे भविष्यातील नोबेल पारितोषिक भारताला दलित साहित्यालाच मिळेल असा विश्वास विद्रोही कवी लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केला.

कवी लोकनाथ यशवंत यांनी सोमवारी दै.‘देशदूत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. संपादक अनिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. मिलींद बागुल उपस्थित होते. कवी लोकनाथ यशवंत म्हणाले की, ‘जातक’ कथनमधून मला कवितांचा आशय मिळाला, आणि मी तसा लिहीता झालो. माझ्या कवितेत वैश्विक अत्याचार, संघर्षाचे प्रतिबिंब उमटते. देशभरात कवी खुप आहेत. मात्र, स्वत:ची ओळख जो पर्यंत होत नाही तोपर्यंत कवित्वाला महत्व येत नाही.

दलित साहित्य हे जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य आहे. पूर्वी धोतर-टोपीत येणारा अन्याय आता सुटा-बुटात आला आहे. त्यामुळे दलित साहित्याला अजूनही योग्य ते स्थान मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. उत्कृष्ट साहित्याला कालखंडाची चौकट लागु होत नाही. आणि उत्कृष्टतेचे कोणतेही ठोकताळे ठरत नाहीत. काय उत्कृष्ट हे वेळ ठरवते. त्यामुळेच मी माझ्या कवीतांना कधीही चौकटीत बांधले नाही.

देशावर धर्मांचा पगडा मोठा असल्याने या देशात व्यवस्था परिर्वतनाचे प्रयत्न असफल ठरतात. त्यामुळेच भारत आजही जगाच्या तुलनेत शेकडो वर्ष मागे आहे. सध्या देशात जे काही घडत आहे. त्यामुळे कवी साहित्यिकांना चांगले दिवस आले आहेत. सीएए आणि एनआरसीवर बालेताना ते म्हणाले की, हे काही जे सुरु आहे. ते माझ्या कल्पनेच्या पलिकडचे आहे. उर्दू भाषेला हिनावले जाते.

मात्र, जगात बासष्ट देशांमध्ये उर्दू भाषा वाचली जाते. नीदा फाजली यांच्या गझला दु;ख काय आहे हे सांगतात, तर गुलजार यांच्या गझला आणि कविता वाचकाला आकर्षित करतात. पाकिस्तानातील कवींच्या कविता अनुवादित करताना फाळणीचे दु;ख कळते. ‘माणसाच्या भाषेत माणसाशी बोल’ या कविता संग्रहातून हेच दु;ख तळागाळातल्या माणसापर्यंत पोचविण्याचे काम मी माझ्या कवितांतून केले आहे. असेही ते म्हणाले. चर्चेचा शेवट कवी लोकनाथ यशवंत यांनी त्यांच्या ‘जेलर’ या गाजलेल्या कवितेच्या ‘जेलर बिनधास्त झोपी गेला, आता कैदी एकमेकांवर नजर ठेवून आहेत’ या ओळी सादर करीत केला.

कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितांचा बैल, हिम्मत या चित्रपटात समावेश झाला आहे. त्यासोबतच त्यांच्या कवितांवर चार नाटके देखील निघाली आहेत. पाकिस्तान, इराण, इराक या देशातल्या कविंच्या कविता त्यांनी अनुवादित केल्या आहेत. उपरोध, उपहास हे त्यांच्या कवितेचे शस्त्र आहे. आता होऊन जाऊ द्या, आणि शेवटी काय झाले, पुन्हा चाल करुया, जेरबंद असे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल यांनी लोकनाथांच्या कवितेचा नागड्या व्यवस्थेला आरसा दाखविणारी कविता असा गौरव केला आहे. रात होते ही जिहादी चिखे मेरे दिमाग में घुसती है, सभी की एक ही मांग, जीने की चिजे के बढते दाम, भुके कंगाल मोर्चा बनकर दुकान फोडते है, दबी चिजें लुट लेते है. ही कविता त्यांची सर्वाधिक गाजलेली कविता आहे.

मी सर्वात श्रीमंत बाप

एकाच वेळी दोन्ही मुलांच्या मराठीच्या पुस्तकात कविता असलेला मी सर्वात श्रीमंत बाप आहे. मोठा मुलगा मुक्तछंद आणि धाकटा मुलगा समुद्र हे बारावी आणि दहावीला असतांना त्यांच्या मराठी पुस्तकात माझ्या कविता होत्या.त्या शाळेने मला बोलवून सत्कार केला म्हणून मी श्रीमंत असून अंबानीपेक्षाही माझी श्रीमंती मोठी असल्याचे लोकनाथ यशवन्त म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com