घरेलू कामगारांच्या मदतीसाठी निधी - कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

घरेलू कामगारांच्या मदतीसाठी निधी - कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी आणि नूतनीकरण झालेल्या घरेलू कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात सक्रिय तसेच जीवित नोंदणी असलेल्या एकूण १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

या निर्णयानुसार नोंदीत १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण (डीबीटी) द्वारे प्रत्येकी दीड हजार रुपये वितरित करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या स्तरावरून लवकरच करण्यात येत आहे. घरेलू कामगारांच्या थेट खात्यात शासनातर्फे मिळणारा हा निधी जमा होणार असल्याने घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण पध्दतीने (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार आजपर्यंत ११ लाख १० हजार ९२९ नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

३० एप्रिलअखेर १६६ कोटी ६३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com