पुण्यास पावसाने झोडपले: चार जण गेले वाहून

पुण्यास पावसाने झोडपले: चार जण गेले वाहून

पुणे

पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरक्ष: दाणादाण उडऊन दिली. रात्री नऊ सुरू झालेला पाऊस रात्री बाराला कमी झाल्यानंतर लोकांचा जीव थोडा भांड्यात पडला खरा परंतु तोपर्यन्त शहरा तील आणि जिल्ह्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.

अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ओढ्यान्ना पुर आले होते. दौंड तालुक्यातील राजेगावामध्ये ओढ्याला आलेल्या पुरात चारजण वाहून गेले. दुचाकीवरून ही चौघे जात होते. दुपारपर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले होते.

भिगवण येथून दौंडकडे जात असताना राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात ते वाहून गेले आहेत. शहाजी गंगाधर लोखंड (52), सुभाष नारायण लोंढे (48), अप्पासो हरीचंद्र धायतोंडे (55) आणि कलावती अप्पासो धयातोंडे (48) अशी त्यांची नावे आहेत. सुभाष लोंढे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. इतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी पावसाने कहर केला. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने रात्री साडेआठनंतर रौद्ररूप धारण केल्याने सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने ते बंद झाले. कात्रज तलाव तुडुंब भरून वाहिल्याने आंबिल ओढय़ाच्या पाणीपातळीत वाढ झाली. गतवर्षी २५ सप्टेंबरला याच ओढय़ाच्या पुरामुळे दक्षिण पुण्यात हाहाकार उडाला होता. त्यामुळे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधारांनी नागरिकांमध्ये धडकी भरली होती. मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, वसाहतींमध्ये शिरलेले पाणी काढण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून रात्री उशिरापर्यंत काम सुरू होतं.

मुख्य भागात पाणी

शहरातील मुख्य भागात पाणी आल्याने रस्ते बंद झाले. शहर आणि परिसरात दुपारनंतर हळू हळू पावसाचा जोर वाढला. रात्री आठ ते नऊच्या सुमारास पावसाने खूप जोर धरला होता. परिणामी शहरातील सखल भागांत पाणी साचले , अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तर रात्री सिंहगड रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. . दरम्यान रात्री १२ वाजता पाण्याचा जोर कमी झाला. शहरातील विविध भागात पाणी शिरल्याचे सुमारे ९० फोन अग्निशमन दलाच्या कार्यालयात आले. शहरातील बहुसंख्य रस्ते चाैकांतून पाणी तुंबल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.यामुळे कामानिमीत्त बाहेर पडलेल्यांची मोठी तारांबळ उडाली. नगर रोडला चंदननगर पोलिस ठाणे अक्षरशः पाण्यात तरंगत होते. चौकात, रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

ओढ्यालगतच्या वसाहतींमध्ये पाणी

शहरातील टांगेवाला कॉलनी, गुरुराज सोसायटी, ट्रेझर पार्कसह आंबील ओढ्यालगतच्या वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे. टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना विद्या विकास शाळेत हलविण्यात आले आहे. तर ट्रेझर पार्क सोसायटीतील नागरिकांची तळ पार्किंगमध्ये पार्क करण्यात आलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी धावपळ आज सुरू होती .

अरण्येश्वर मंदिर, गजानन महाराज मठ परिसर येथून कमरे इतके पाणी वाहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली . गजानन महाराज मठा मागील साती आसरा शाळेत देखील पाणी शिरले आहे. येथील १५ ते २० जनावरे स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली आहेत. बल्लाळ सोसायटीत पाणी शिरले आहे. तळजाई परिसरातील रस्त्यावर प्रचंड पाणी वाहत आहे. सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर या भागात रस्त्यावरून जोरदार पाणी वाहत आहे. लक्ष्मीनगर शाहू वसाहत व मार्केटयार्ड येथील आनंदनगर येथील घरामध्ये पाणी शिरले आहे नागरिकांची झोप उडाली आहे.

महर्षीनगर भागातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ विजेचा लपंडाव सुरू होता. मुसळधार पावसाच्या पाण्याचा फटका अनेक कुटुंबांना बसला, गुलटेकडी परिसरातील इंदिरानगर, डायस प्लॉट, खिलारे वसाहत, मार्केटयार्ड भागातील आंबेडकरनगरमधील अनेक घरांत पाणी शिरले. रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असताना वाहने वाहून गेल्याचे प्रकार घडले.

घरांत 3 ते 4 फूट पाणी

औंध, बाणेर रस्ता, सकाळ नगर, बोपोडी, पंचवटी, पाषाण, सूसरस्ता, सूस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पाषाण सूसरस्ता येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. बाणेर बालेवाडी परिसरात गेल्या दोन तासांत मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. लक्ष्मीनगर येथील शाहू वसाहतीमध्ये अनेक घरांत 3 ते 4 फूट पाणी शिरले. घोरपडीमध्ये अर्धा तासापासून वीज गेली असून, रस्त्यावर व खोलगट भागात पाणी साचले आहे.

सहकारनगर संतनगर अण्णा भाऊ साठे नगर येथील वस्ती मध्ये पाणी शिरले असून नागरीक घरातील पाणी काढत आहे. लक्ष्मी नगर शिवदर्शन, शाहू वसाहत, शंकर महाराज वसाहत, आनंद नगर,संभाजी नगर शंकर महाराज वसाहत या भागात घरांमध्ये पाणी शिरले आहे. लेकटाऊन हौसिंग सोसायटीचे बेसमेंट मध्ये पाणी शिरत आहे. सागर कॉलनी, लालबहादुर शास्त्री कॉलनी येथील घरांमध्ये पाणी शिरले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com