मुंबई -

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा (वय 72) यांचे आज संध्याकाळी निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेले दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते.

1980 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत झाले. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदार संघात उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून पुन्हा वाडा मतदार संघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला. दोन वेळा पराभव पत्करुनही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले होते.

सन 1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने वाडा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली. यावेळी मात्र त्यांनी विजय प्राप्त करुन आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या निवडणुकी नंतर झालेल्या सन 2014 पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून सातत्याने सहावेळा विजयी होण्याचा सन्मान मिळविला.

सन 1995 च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 1999 रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली.राज्यातील शंभरहून अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. विक्रमगड तालुक्याची निर्मिती, वाडा येथील 220 के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र, वाडा एसटी आगाराची निर्मिती, वाडा, विक्रमगड मध्ये आयटीआय कॉलेज, निंबवली, केळठण, तिळसा, ब्राम्हणगांव, उंबरखांड, शिरगाव येथील पुलांची कामे अशा अनेक कामांसोबत आदिवासी भागात प्रत्येक गावाला जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे अशी अनेक कामे त्यांनी केली.

सन 2014 मध्ये भाजपा सरकार मध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचाही त्यांना सन्मान मिळाला. मंत्री झाल्यावर त्यांनी सर्वांबरोबर अतिशय नम्रतेने वागून आपल्या स्वभावाची एक वेगळीच छाप पाडली होती.

जनतेच्या प्रश्नांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असत. शेतकर्यांचा कर्ज मुक्तीचा लढा, दुष्काळाचा प्रसंग, कुपोषणाचा प्रश्न, अतिवृष्टी सारखे संकट, जिल्हा विभाजनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे त्यांचे कधीही न विसरता येणारे काम आहे.

तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सवरा यांनी आमदार चषक, विविध क्रीडा स्पर्धा सुरु केल्या. ते स्वत: हॉली बॉलचे उत्तम खेळाडू होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे पालघर जिल्ह्यातील शेकडो खेळाडूंना विविध खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली.

तीस वर्षे वाडा भागाचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी विधानसभेत शेकडो कपात सूचना, लक्षवेधी, तारांकित प्रश्न, तसेच त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने आदिवासी भागातील अनेक समस्या मार्गी लावण्यात त्यांनी यश मिळवले. सत्तेपेक्षा सेवा समाधानकारक मानणा-या विष्णु सवरा यांनी आमदार निधी, डोंगरी विकास निधी, विशेष घटक योजना, नाबार्ड, हुडको, विशेष दुरुस्ती, वैज्ञानिक विकास, कोकण विकास व बजेटच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यामध्ये त्यांनी यश मिळवले.

दांडगी स्मरणशक्ती असलेले विष्णु सावरा हे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, सामान्य माणसाला ते नावानिशी ओळखत असत. त्यांच्या गोड वाणीने वृद्धांपासुन ते लहान मुलांपर्यंत सर्वांचे परिचित झाले होते. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने एक अजातशत्रू लोकप्रतिनिधी अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती.