सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

पुण्यातील राहत्या घरी त्यांनी घेतला अखेरचा श्वास
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत

पुणे l Pune

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते.

उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. पी. बी. सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती.

पी. बी. सावंत यांचा जन्म ३० जून १९३० रोजी झाला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे वकील म्हणून सराव सुरू केला. १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. १९७३ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्ष त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. १३३५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. तसेच पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती.

न्यायमूर्ती म्हणून पी बी सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते. तत्कालीन मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पी. बी. सावंत अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. २३ फेब्रुवारी २००५ रोजी आपला अहवाल सादर केला होता, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते, परंतु विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केलं गेले. त्यांच्या अहवालामुळेच सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा दिला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com