ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

11 वेळा होते आमदार
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर / solapur - शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आज दुपारी 1 वाजता त्यांच्या पार्थिवावर शेतकरी सहकारी सुतगिरणी सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी साडे 11 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात होणार असून दुपारी 1 वाजता सांगोला येथील शेतकरी सहकारी सुतगिरणी येथे गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 ला झाला होता. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वात प्रथम निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे ते 11 वेळा आमदार झाले. सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आबा या नावाने ते सगळ्या महाराष्ट्रात परिचित होते.

गणपतराव देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते. शरद पवार यांनी जेव्हा पुलोद सरकारचा प्रयोग केला त्यावेळी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला होता. 1999 लाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. 2012 मध्ये विधानसभेतल्या त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारने त्यांचा गौरव केला होता.

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता.

2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून एम.करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार ठरले होते.अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.

टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोल्याला आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याआधारे सांगोल्याला दुष्काळमुक्त केले. याशिवाय शेतकरी, कष्टकर्यांच्या मुलांसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. वयाच्या 94 व्या वर्षातही ते लोकहितासाठी सक्रिय होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com