MBBS ची परीक्षा ऑफलाईनच !

कधी पासून सुरु होताय परीक्षा?
MBBS ची परीक्षा ऑफलाईनच !

मुंबई l Mumbai

वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात MBBS अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. मात्र

या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून या व पुढील MBBS अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिली आहे.

MBBS ची अंतिम वर्षाची परीक्षा ८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षा केवळ ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात येतील. ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने म्हटलं.

राज्यात करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालकांनी परीक्षा ऑनलाइन करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा ऑनलाईन परीक्षा घेण्यास नकार दिला.

या संदर्भात एमयूएचएस (MUHS) परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी म्हटले आहे की, राज्यभरात विविध प्रकारची क्षेत्रे आहेत, ज्यात बरीच महाविद्यालये दुर्गम, डोंगराळ भागात आहेत. या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण निर्णाम होऊ शकते. त्यामुळे केवळ ऑफलाइन परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली किंवा ज्या विद्यार्थ्यांमध्ये करोनाची लक्षण दिसतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आयसोलेशन रूमची वेगळी व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली आहे.

नुकतेच MBBS सह इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेजने UG अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक रिशेड्यूल केले आहे. या परीक्षा यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु, आता या परीक्षा ८ मार्चपासून सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून सुरू होतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com