करोनाशी लढताना शिवरायांची प्रेरणा व जिद्द मिळतेय - मुख्यमंत्री

करोनाशी लढताना शिवरायांची प्रेरणा व जिद्द मिळतेय  - मुख्यमंत्री

पुणे (प्रतिनिधि) -

आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे.

पण तोंडावर मास्क आहे.छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असल्याचे सांगितले.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. छत्रपती संभाजीराजे, खा. डॉ.अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके, आ. विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे, हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे.मनात, ह्रदयात शिवरायांचे स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे.

छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला.छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार, असे सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त शिवभक्तांचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. कोरोना नियमांचं पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊदे, असे आवाहन त्यांनी केले.

शिवनेरी परिसरातील विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी संपूर्ण शिवनेरीचे पावित्र्य, महत्त्व लक्षात घेता विकास कामे दर्जेदार करावीत, तसेच कामे वेळेत सुरू करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

राज्य तसेच शिवनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता योग्य अंतर, मास्कचा वापर, गर्दी टाळा तसेच शासनाच्या दक्षता नियमांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, शासनाने किल्ला संवर्धन व जतनाबाबत मोहीम हाती घ्यावी तसेच समुद्रातील किल्ले बाबत वाहतूक व्यवस्था करून पर्यटनाला गती द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य सादरीकरण झाले.

त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्य मंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

यावेळी 'शिवयोग' या टपालाचे विशेष आवरण (कव्हर) तसेच वन विभागाच्या माध्यमातून 391 वृक्षांच्या रोपणांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com