मुंबईत महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

नोकरदार महिलांना गुढीपाडव्याची भेट
मुंबईत महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
जितेंद्र आव्हाड

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या महिलांसाठी ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर सुसज्ज वसतिगृह बांधण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी केली.

मुंबईत महिलांच्या निवासासाठी व्यवस्था उभी करण्याचे घोषित करून सरकारने महिलांना गुढीपाडव्याची भेट दिली आहे. या वसतिगृहात एक हजार महिलांच्या राहण्याची सोय होणार आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्यभरातून महिला येथे नोकरी करण्यासाठी येतात., मात्र त्यांना कार्यालयाच्या जवळ राहणे शक्य होत नाही. कार्यालयापासून दूर उपनगरांमध्ये राहावे लागत असल्याने रोजच्या प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. ही गरज ओळखून ‘म्हाडा’ अंतर्गत ताडदेव येथील एम.पी.मिल कम्पाउंड परिसरात महिलांसाठी हे सुसज्ज वसतिगृह उभारणार आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.

मंत्रालय, मुंबईसेंट्रल, महालक्ष्मी, ग्रँट रोड अशा महत्त्वूपर्ण ठिकाणांपासून हे वसतिगृह अगदीजवळ असल्याने मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास वाचणार आहे.

४५० खोल्यांचे हे सुसज्ज वसतिगृह साधारणपणे दीड ते दोन वर्षात उभारले जाणार असून येत्या सहा महिन्यांत त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू केले जाणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

या कामासाठी अंदाजे ३५ कोटीरुपये एवढा खर्च अपेक्षित असून वसतिगृह उभारल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम स्वतंत्र संस्था करेल. जेणेकरून त्याची गुणवत्ता आणि सोयीसुविधांवर परिणाम होणार नाही,असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com