मीटर रीडिंगमुळे वीज ग्राहक त्रस्त ; ‘यामुळे’ आता ‘नो झंझट’

मोबाईलसारखे रिचार्ज करून वापरता येणार वीज
मीटर रीडिंगमुळे वीज ग्राहक त्रस्त ; ‘यामुळे’ आता ‘नो झंझट’

मुंबई / mumbai - राज्याच्या ऊर्जा विभागाकडे घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंगशी संबंधित तक्रारी सतत येत असतात. या तक्रारींवर राज्याच्या ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. घरगुती वीज ग्राहकांना ‘स्मार्ट’ मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई, उपनगरे, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद यासारख्या महानगरांत प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नितीन राऊत यांनी याबाबत निर्देश दिले. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या. मोबाईल सिमच्या वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असेल. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रीपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत, त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल.

स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे. मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल, तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीज चोरीस आळा बसेल.

असे असेल स्मार्ट मीटर?

- विजेचे मीटर पोस्टपेड-प्रिपेड स्वरूपात असेल

- मोबाईलसारखेच करता येईल विजेचे मीटरही रिचार्ज

- अ‍ॅडव्हान्स मिटरींग इन्फ्रास्ट्रक्चर या योजनेंतर्गत हे स्मार्टमिटर बसवले जातील

- वीज बिलांबाबत होणारे घोळ, तांत्रिक अडचणी, यंत्रणेवरचा ताणही कमी होईल

- विजेच्या बचतीसाठी स्मार्ट मीटर उपयोगी ठरणार

- ओपेक्स मॉडेलनुसार स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रस्ताव

- देशभरात असे 25 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याची योजना. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होणार

स्मार्ट मीटरचा असा होईल फायदा

- मीटर रीडिंग घेण्यासाठी प्रत्यक्ष कर्मचारी पाठवण्याची गरज नाही

- वापरलेल्या विजेची माहिती एका क्लिकवर मिळेल

- वीज चोरीला आळा बसेल. मीटरसोबत छेडछाड होत असेल, तर ती लगेच पकडता येईल

- स्मार्ट पद्धतीने भारनियंत्रण करता येईल

- वीज बचतीसाठी नियोजन करणे सुलभ होईल

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com