
मुंबई | Mumbai
महावितरणच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून वीज कर्मचारी (MSEB Employee Strike) संपावर गेले आहेत. तीन दिवस हे कर्मचारी संपावर असणार आहेत.
मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच वीज कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने देखील कंबर कसल्याचे सांगितले गेले होते. परंतू, मध्यरात्रापासून बंद पडलेला वीज पुरवठा काही महावितरणला सुरु करता आलेला नाहीय.
दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-१९१२, १८००-२३३-३४३५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे (MSEB) संचालक विश्वास पाठक यांनी राज्यातील जनतेला कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली. विश्वास पाठक म्हणाले, “राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी.”